लग्न सोहळा म्हटला की वऱ्हाडी मंडळीचे स्वागत, नवरदेवाची मिरवणूक, मंगलाष्टके अशी विविध विधींची धूम पाहायला मिळते. मात्र, या धामधुमीतही शहरातील एका विवाह सोहळ्यात ‘दिव्य मराठी’च्या ‘मौन सोडू, चला बोलू’ उपक्रमांतर्गत प्रतिज्ञा घेण्यात आली.
रिंग रोडवरील जानोरकर मंगल कार्यालयात शुक्रवारी जळगावमधील वर आशिष गुरव आणि अकोल्यातील वधू नम्रता शिंदे यांचा विवाह मोठ्या थाटात पार पडला. सनई-चौघड्याचे सूर व शेकडो वऱ्हाडींच्या उपस्थितीत विवाहबद्ध झालेल्या नवदांपत्याच्या साक्षीने ‘आता एकही फुलराणी जळणार नाही’ ही प्रतिज्ञा या सोहळ्यात करण्यात आली. शिंदे आणि गुरव परिवारासह पाहुणे मंडळींनी या प्रतिज्ञेसाठी पुढाकार घेतला. या वेळी सुनीता शिंदे, सुनील शिंदे, सारंग शिंदे, धोंडीबा गुरव, मंदा गुरव, अश्विनी अंजनकर यांच्यासह आकाश कवळे, राहुल सारवान, सम्राट ठाकरे, अभिजित तवर, आशिष इंगोले, मुकुंद सरनायक, रवी खरे आदींसह अनेकांची उपस्थिती होती.
या प्रतिज्ञेसाठी शुक्रवारी जिल्ह्यातील शाळा- महाविद्यालयांमध्ये तर रांगा लागल्याच, मात्र विवाह सोहळ्यातही ही प्रतिज्ञा घेण्यात आल्याने समाजात जनजागृती करण्यासाठी हा उपक्रम कौतुकास्पद आहे. त्यामुळे प्रतिज्ञेतील संदेश प्रत्येकाने अमलात आणण्याची आज गरज आहे, अशा प्रतिक्रियाही पाहुणे मंडळींनी व्यक्त केल्या.