अमरावती - प्रेमविवाह न करण्याची शपथ दिल्याप्रकरणी विदर्भ यूथ वेलफेअर सोसायटीद्वारा संचालित टेंभुर्णी (ता. चांदूर रेल्वे) येथील महिला कला, वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र हावरे, प्रा. डॉ. प्रदीप दंदे व राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. व्ही. डी. कापसे यांना एक सदस्यीय चौकशी समितीचा अहवाल येईपर्यंत गुरुवारी (दि. २७) निलंबित करण्यात आले. ही कार्यवाही संस्थेचे सचिव युवराजसिंग चौधरी यांनी केली. या अजब शपथेमुळे राज्यभरात वादळ उठले होते.
चांदूर रेल्वे येथील महिला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे शिबिर ७ ते १४ फेब्रुवारीदरम्यान तालुक्यातील टेंभूर्णी येथे आयोजित करण्यात आले होते. प्रेमप्रकरणातून तरुणी, विद्यार्थिनींवर होत असल्याच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर “युवकांपुढील आव्हाने’ या विषयावर प्रा. प्रदीप दंदे यांनी १३ फेब्रुवारीला मार्गदर्शन केले होते. यात प्रा. दंदे यांनी प्रेमप्रकरणातून निर्माण होणारे धोके, विकृत मानसिकतेतून होणारे शोषण याबाबत विद्यार्थिनींमध्ये जागृती निर्माण होऊन निखळ प्रेम व विकृत प्रेम यातील फरक समजावून सांगितला होता. त्यानंतर त्यांनी विद्यार्थिनींना थेट “प्रेम व प्रेमविवाह न करण्याची’च अजब शपथ दिली. यासोबतच हुंडा न देण्याबाबतही या शपथेत म्हटले होते. परंतु या शपथेवरून माध्यमांसह राज्यभर प्रचंड गदारोळ उडाला. त्यानंतर महाविद्यालय प्रशासनाच्या वतीने १५ फेब्रुवारी रोजी सारवासारव करण्याचा प्रयत्न करून माफीनामाही प्रसिद्ध करण्यात आला होता. यात प्राचार्य डॉ. हावरे यांनी म्हटले होते की, शिबिरात दिलेली शपथ ही उन्मादी प्रेमाच्या विरोधात होती. मुलींच्या अल्लडपणाचा फायदा घेऊन काही तरुण मुले त्यांना प्रेमाच्या नावाखाली आपल्या जाळ्यात ओढतात आणि नंतर मुलींना त्रास देतात. त्यातून बऱ्याच विपरीत घटना घडतात. त्याचे परिणाम आपल्यासह आपल्या पालकांना सहन करावे लागतात. आपली नाहक बदनामी होते. म्हणून अशा घटनांना वेळीच लगाम लावणे आवश्यक असते. त्यासाठी मुलींनी आधी आपले शिक्षण व आपले करियर घडविण्यासाठी सतत लक्ष दिले पाहिजे व असे परिणाम टाळले पाहिजे. या भावनेने आम्ही ती शपथ विद्यार्थ्यीनींना दिली होती.
शपथेसाठी पूर्वपरवानगी नाही
या शपथेसाठी संस्थेकडून कोणतीही पूर्वपरवानगी घेण्यात आली नव्हती. विदर्भ यूथ वेलफेअर सोसायटीचे अध्यक्ष डॉ. नितीन धांडे यांनी या प्रकरणाची तात्काळ दखल घेऊन संस्थेचे सचिव युवराजसिंग चौधरी यांच्यामार्फत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र हावरे, प्रा. डॉ. प्रदीप दंदे व राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा. डॉ. व्ही. डी. कापसे यांच्यावर निलंबनाची कार्यवाही केल्याचे सांगण्यात आले.
प्रकरणाची चौकशी सुरू
सदर प्रकरणाची चौकशी करण्यासाठी एक सदस्यीय चौकशी समिती गठित केली असून चौकशीचे काम सुरू आहे. कोणत्याही असंवैधानिक कार्यक्रमाला संस्थेतर्फे चालवण्यात येणाऱ्या महाविद्यालयात थारा नाही व नियमबाह्य प्रकार महाविद्यालयात खपवून घेतला जाणार नाही. यासोबतच कोणत्याही नियमबाह्य प्रकाराची गय केली जाणार नाही.
डॉ. नितीन धांडे, अध्यक्ष, विदर्भ वेलफेअर सोसायटी