शेवटचा रुग्ण बरा झाल्याने रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना आनंदाश्रू

हनोई. जगभरात कोरोनाचा कहर सुरू आहे. व्हिएतनामही या जीवघेण्या विषाणूचा सामना करतोय. या दरम्यान येथील बिन्ह थुआन राज्य पूर्णपणे कोरोनामुक्त झाले आहे. साउथ सेंट्रल कोस्टमधील सामान्य रुग्णालयातील डॉक्टर, नर्स आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना कोरोनाचा शेवटचा रुग्ण पूर्णपणे बरा झाल्याचे समजताच ते आनंदाने ओरडू लागले आणि एक- दुसऱ्याला बिलगून रडू लागले.


कोरोना वॉर्डमधील १७ कर्मचाऱ्यांपैकी कोणीच गेल्या एक महिन्यापासून घरी गेलेला नाही. रुग्णालयाचे संचालक डॉ. गुएन वान थान्ह यांनी सांगितले की, रात्री सुमारे साडेआठ वाजले होते. कोरोना रुग्णांची तपासणी आणि आैषधी दिल्यानंतर सगळे कर्मचारी जेवणाच्या तयारीत होते. या वेळी एक वृत्त आले की, रुग्णालयात दाखल कोविड- १९ च्या शेवटच्या रुग्णाचा अहवाल निगेटिव्ह आला असून तो पूर्णपणे बरा झाला आहे. हे एेकताच सगळे कर्मचारी आनंदाने ओरडत पळू लागले आणि जो येईल त्याच्या गळ्यात पडून रडू लागले. प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू होते. आमच्या येथे बरा झालेला ३६ वा रुग्ण मुलगी होती. तिला हायपरटेन्शन आणि फुफ्फुसाचा आजार होता. यामुळे दुसऱ्या रुग्णांपेक्षा तिचा उपचार कठीण होता, मात्र आम्ही यशस्वी ठरलो.


महिन्यापासून कर्मचारी घरी गेले नाहीत, आता लवकर भेटतील


रुग्णालयातील संसर्गजन्य आजार विभागाचे प्रमुख डॉ. डूंग थी लोइ यांनी सांगितले, आम्ही भावना रोखू शकलाे नाही. हे आनंदाचे अश्रू आहेत. आमच्याकडे सुविधा नाहीत. मर्यादित साधनांनी आम्ही कोरोना रुग्णांवर रात्रंदिवस उपचार करत राहिलो. सर्वजण रुग्णालयात राहिलो व क्वाॅरंटाइन करून घेतले. कुटुंबीयांशी केवळ चॅट व व्हिडिओ कॉलद्वारे बोलायचो. आता सर्व काही ठीक झाल्याने लवकरच कुटुंबाला भेटण्याची आशा आहे.