संपूर्ण जग काेराेना संकटाचा सामना करत आहे. काेराेनाचा मुकाबला करण्यासाठी सध्या काेणतेही हमखास आैषध नाही. अशामध्ये केवळ ‘हायड्राॅक्सीक्लाेराेक्वीन’ (एचसीक्यू) या एकाच आैषधाची जास्त चर्चा आहे. केंद्र सरकारने २५ मार्च राेजी या आैषधाच्या निर्यातीवर बंदी घातली. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांच्या मागणीनंतर ही बंदी हटवण्यात आली. केवळ अमेरिकाच नाही तर जगातील अनेक देश भारताकडे या आैषधाची मागणी करत आहेत. हे आैषध काेराेनावरचे नाही तर मलेरियावरचे आहे. सुरुवातीच्या टप्प्यात काेराेनाच्या विराेधातील हे सर्वात प्रभावशाली आैषध मानले जात आहे. मलेरिया प्रतिबंध, संधिवातावरील उपचारासाठी गेल्या ७६ वर्षांपासून भारतात उपयाेगात येणाऱ्या या आैषधाचा बाजारात अचानक तुटवडा निर्माण झाला आहे. दुसऱ्या जागतिक युद्धामध्ये या आैषधाचा माेठ्या प्रमाणावर वापर झाला. ही गाेळी प्रामुख्याने प्रतिकारशक्ती वाढवते. १९४० नंतर त्याचा उपयाेग मलेरियावरील उपचारासाठी करण्यात येत आहे. सध्या बहुतांश आैषधांच्या दुकानातून त्याचा साठा गायब झाला आहे.
भारताने १३ देशांना या आैषधाचा पहिला साठा पाठवला आहे. यात अमेरिका, स्पेन, जर्मनी हे देश आहेत. देशामध्ये ८० टक्के एचएसक्यूचे उत्पादन इप्का व झायडस कॅडिला करते. देशात एचसीक्यूच्या एकूण उत्पादनाचा १० टक्के वापर हाेताे व बाकी ९० टक्के ५० देशांना निर्यात केले जाते. अमेरिकेने ४० लाख टॅब्लेटची मागणी केली आहे. परंतु, भारताने ३५ लाख टॅब्लेट पाठवण्यास परवानगी दिली आहे. शेवटी या आैषधाची इतकी मागणी का वाढली व काेराेनाच्या उपचाराशी याचा काय संबंध आहे हे जाणून घेऊया...
काय आहे एचसीक्यू?
एचसीक्यू मलेरिया प्रतिबंध आैषध आहे. हे ह क्लोरोक्वीनचे एक रूप आहे. मलेरियावरील उपचारात क्लोरोक्वीनचा उपयाेग केला जाताे. मलेरियाव्यतिरिक्त एचसीक्यूचा उपयोग संधिवातासारख्या आजारावर केला जाताे. ते प्रतिकारशक्ती वाढवते. १९३४ मध्ये एचसीक्यूचा शाेध लागला हाेता.
भारत का आहे चर्चेत ?
अमेरिका, ब्राझीलसह जगातील अनेक देश या आैषधासाठी भारतावर अवलंबून आहेत. फोर्ब्जच्या एका अहवालानुसार जगभरात वापरल्या जाणाऱ्या एकूण एचसीक्यू गाेळ्यांपैकी ७० टक्के उत्पादन भारतात केले जाते. भारत या आैषधाचा सर्वात माेठा पुरवठादार देश आहे.
जग अवलंबून कसे ?
वास्तविक डासांच्या समस्येमुळे भारतात याचे उत्पादन सर्वाधिक हाेते. पण अमेरिकेसारख्या विकसित देशात मलेरिया पसरवणाऱ्या डासांचा प्रकाेप कमी असल्याने तेथे या आैषधांचे उत्पादन हाेत नाही.
आपली क्षमता किती
सध्या दरमहा ४० मेट्रिक टन हायड्रॉक्सी-क्लोरोक्विीन औषधाचे सक्रिय औषधी घटक (एपीआय) उपलब्ध आहेत. या औषधाचे दरमहा २०० मिलिग्रामच्या २० काेटी गाेळ्यांचे उत्पादन हाेऊ शकते. सध्या क्षमतेच्या तुलनेत फक्त ५०%उत्पादन सुरू आहे. लॉकडाऊनचा परिणाम झाला आहे. एआयओसीडी अॅेव्हेक्स फार्मा टेक कंपनीच्या मते, फेब्रुवारी २०२०पर्यंतच्या 12 महिन्यांत एचसीक्यूची बाजारपेठ १५२.८० काेटी रुपयांची हाेती.
एचसीक्यू आणि कोरोनाचा संबंध जाणून घ्या...
१. एचसीक्यूने कोरोना बरा होतो?
नाही. एचसीक्यू कोरोनावरील उपचार अद्याप सिद्ध झालेला नाही. विविध संशोधनानुसार, या औषधामुळे कोविड-१९ च्या विषाणूचा प्रभाव कमी होतो. मात्र नष्ट करत नाही. अमेरिका, इंग्लंड, स्पेन व ऑस्ट्रेलियासह अनेक देशांंमध्ये चाचणी सुरू आहे. एचसीक्यू परिणाम जाणण्यासाठी दोन मोठी परीक्षणे सुरू आहेत. पहिली डब्ल्यूएचओचे सॉलिडेरिटी ट्रायल, याचा भाग भारतही आहे. तर दुसरी क्लोरोक्वीन एक्सेेलरेटर चाचणी आहे, जी वेलकम ट्रस्ट, यूके आणि बिल मेलिंडा गेट्स फाउंडेशनतर्फे सुरू आहे.
२. मी एचसीक्यू घेऊ शकतो का?
युरोपमध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गितांची संख्या लाखांंमध्ये आहे. युरोपियन मेडिसिन्स संस्थेनुसार, कोरोना रुग्णांनी एचसीक्यू सेवन करू नये. दुष्परिणामांमुळे स्वीडनमधील रुग्णालयांनी याचा वापर बंद केला. मेयो क्लिनिकचे डॉ. मायकेल एकरमॅन म्हणाले, ९० टक्के लोकसंख्येसाठी हे औषध गुणकारी असले तरी हृदय विकार रुग्णांसाठी घातक ठरू शकते. डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय हे औषध घेऊ नका. स्वस्थ असलेल्या लोकांनी हे न खाण्याचा सल्ला आयसीएमआरने दिला आहे.
३. या औषधाची एवढी मागणी का? इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने हे औषध कोरोना प्रकरणे हाताळणाऱ्या वैद्यकीय कर्मचाऱ्यांना देण्याची शिफारस केली होती. कोरोनाची लक्षणे नसलेल्या मात्र कोरोना रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांनाही हे देता येऊ शकते. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांंनी या औषधाची मागणी केल्यामुळे व कोरोनावरील उपचारामध्ये एचसीक्यूच्या वापराची शक्यता वर्तवल्यानंतर या औषधाची मागणी वाढली आहे. दरम्यान, अमेरिकेतच कोरोनावर हे प्रभावी असल्यावरून डॉक्टर, शास्त्रज्ञ व तज्ञांमध्ये मतभेद आहेत.